कार्नेशन हे एक महत्वाचे फुलझाड असून, जगातील कटफ्लॉवर व्यापारात याचा मोठा वाटा आहे. जास्त दिवस टिकण्याची क्षमतेबरोबरच, लांबवर वाहतुकीतही टिकण्याच्या गुणधर्मामुळे शेतकऱ्यात हे पिक लोकप्रिय आहे.
खासकरून व्हॅलेंटाईन डे, इस्टर, मदर डे आणि ख्रिसमस यामध्ये याची मागणी फार असते. शिमला, कुलू, मनाली, कलिंपोंग, ऊटी, कोडाईकनाल, बेंगळुरू, पुणे, नाशिक ही थंड हवामान असलेली ठिकाणे कार्नेशन फुलांच्या उत्पादनासाठी सर्वात योग्य आहेत.
कार्नेशनचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक म्हणजे स्टॅन्डर्ड व दुसरा स्प्रे प्रकार. स्टँडर्ड प्रकारातील फुले मोठी व लांब दांडयाची असतात, तर स्प्रे प्रकारातील फुले आकाराने लहान असतात. स्टँडर्ड प्रकारच्या फुलांना बाजारात मोठया प्रमाणावर मागणी असून, सध्या स्प्रे प्रकारच्या फुलांनाही मागणी वाढते आहे. सर्वसाधारणपणे, स्टँडर्ड प्रकारातील पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांना मोठी मागणी असते. त्याचबरोबर लाल, पिवळा व डबल कलरमधील फुलांनाही मागणी वाढते आहे. ऋतुमानानुसार अथवा सणांनुसार फुलांच्या रंगाची मागणी बदलते. उदा. ख्रिसमसच्या वेळेस लाल रंगाच्या फुलांना जास्त मागणी असते.
हवामान
या फळपिकांना थंड हवामान मानवते. कमी आर्द्रता व भरपूर सूर्यप्रकाशात याची चांगली वाढ होते. स्टैंडर्ड प्रकारच्या फुलांना थंड हवामान आवश्यक असते, तर स्प्रे प्रकारातील फुलांना थोडे उष्ण हवामान चालू शकते.
सूर्यप्रकाश
या पिकास भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. स्वच्छ व मोठा दिवस असताना पिकाची जोमदार वाढ होते. सर्वसाधारणपणे १८ पानांच्या जोडया झाडावर आल्यानंतर फुले येण्यास सुरुवात होते. पण जर ४-६ आठवडे जास्त वेळ सूर्यप्रकाश मिळाल्यास ४-७ पानांच्या जोडया असतानाच फुले येऊ शकतात.
तापमान
चांगल्या प्रतीची फुले मिळण्यासाठी स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाशाबरोबरच कमी तापमानाची आवश्यकता असते. हिवाळयातील रात्रीचे तापमान १०-१२ सें व उन्हाळयातील १३-१५ सें तापमान पिकास मानवते. १८ सें. दिवसाचे तापमान राहिल्यास अत्युच्च प्रतीची फुले मिळतात.
स्टँडर्ड प्रकारातील फुलांना थंड हवामान मानवते. अन्यथा मोठया प्रमाणावर हे पीक रोगांना बळी पडते. म्हणूनच तर अशा प्रकारचे हवामान असणा-या (१३-१४ सें). बोगोटा (कोलंबिया) येथे स्टैंडर्ड प्रकारातील सर्वाधिक क्षेत्र आहे. स्प्रे प्रकारातील फुलांना थोडे जास्त तापमान (१६-१९ सें) मानवते.
कार्नेशन लागवडीसाठी मातीची निवड करणे
कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये कार्नेशन्सची लागवड यशस्वी ठरू शकते, परंतु माती चांगली निचरा होणारी असली पाहिजे.
गादीवाफ्यावर किंवा पॉटमध्ये कार्नेशनची लागवड केली जाते. त्यामागे पाण्याचा योग्य निचरा व्हावा हा हेतू असतो. रोपांच्या लागवडीकरिता जमिनीत शेणखताबरोबरच नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश ची योग्य मात्रा मिसळावी. शेणखत व फॉस्फरस जमीन तयार करताना मिसळावे तर नायट्रोजन व पोटॅश दोन हप्त्यात द्यावे.
जमिनीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साइड विथ सिल्वर( Hydrogen peroxide (H2O2) with silver) हे केमिकल वापरले जाते.
प्रक्रिया:
साधारणपणे १ एकर (४००० चौ. मीटर) करता १२० लिटर हायड्रोजन पेरोक्साइड विथ सिल्वरची गरज असते.
- प्रथम लागवडीसाठी बनवण्यात आलेले बेड ठिबक सिंचनद्वावरे ओले करावेत.
- त्यानंतर ९० लिटर हायड्रोजन पेरोक्साइड विथ सिल्वर १०,०००-११,००० लिटर पाण्याबरोबर मिसळावे व ते ठिबक सिंचनाद्वारे बेडवर सोडावे.
- उरलेले ३० लिटर हायड्रोजन पेरोक्साइड विथ सिल्वर ४००० लिटर पाण्यात मिसळावे व ते पाणी झारीने बेडवर व बेडच्या कडेवर फवारावे.
- त्यानंतर आपण ४ ते ६ तासांनी पिकाची लागवड करु शकतो.
लागवडीचे अंतर
उच्च प्रतीच्या फुलांच्या अधिक उत्पादनासाठी १५ x १५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. अशा प्रकारे लागवड केल्यास ४९ झाडे प्रति चौ.मी. क्षेत्रात बसतात. आपल्याकडे २० x २० सें.मी. वर लागवड करणे योग्य राहते. दर दोन वर्षांनी नवीन रोपांची लागवड करावी.
रोपांची लागवड जास्त खोलवर करु नये. अन्यथा रोगाचा प्रादुर्भाव होतो.
खते
खतांचा योग्य प्रमाणात पुरवठा झाडांच्या सुयोग्य वाढीबरोबरच अधिक उत्पादनासाठी आवश्यक असतो. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलांच्या दर्जाबरोबरच उत्पन्नातही मोठया प्रमाणावर घट येते, म्हणून खतांच्या सुयोग्य मात्रा द्याव्यात. २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फूरद, २०० ग्रॅम पालाश, १२५ ग्रॅम कॅल्शियम आणि ४० ग्रॅम मॅग्नेशियम प्रति चौ.मी., पंधरा दिवसांचे अंतराने विभागून दिल्यास, झाडांची चांगली वाढ होऊन उत्तम प्रतीची फुले मिळतात.
कार्नेशनला प्रत्येक पाण्याच्या वेळेस २०० पीपीएम नत्र व पालाश दिल्यास झाडांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. खतांची मात्रा देण्यापूर्वी जमिनीचे पृथःकरण करावे व मगच योग्य प्रमाणात खते द्यावीत.
मशागतीच्या विशेष पद्धती
आधार व्यवस्थापन
कार्नेशन पिकाला आधार देण्याची गरज असते. यासाठी नायलॉनपासून किंवा लोखंडी तारांचा उपयोग केला जातो. पिकाच्या वाढी नुसार त्याचे योग्य आधार व्यस्थापन केले पाहिजे, नाहीतर कार्नेशन पिकाची खोडे वाकून, झाडाची वाढ थांबू शकते.
कार्नेशनचे पिंचिंग
दर्जेदार कार्नेशनचे उत्पन्नसाठी, पिंचिंग या विशेष मशागत पद्धतीचा उपयोग केला जातो. पिंचिंग प्रक्रिया म्हणजे पिकाचा शेंडा खुडणे होय.
चांगल्या प्रतीच्या फुलांसाठी पिंचिंग करणे आवश्यक आहे. साधारणतः लागवडीनंतर ६-७ पानांच्या जोड्या आल्यावर किंवा जमिनीपासून पहिल्या पानापर्यंत ५ सें.मी. वाढ असल्यास शेंडा खुडला जातो. शेंडा खुडल्यामुळे बाजूच्या फांद्यांची संख्या वाढते. ठराविक फांद्याची वाढ करुन एक झाडावर अनेक फुले घेता येतात. स्टँडर्ड किंवा स्प्रे प्रकारात ही पध्दत वापरता येते. शेंडा खुडल्यामुळे ३-४ आठवडे उशिरा फुले येण्यास सुरुवात होते.
पिंचिंगसाठी सकाळची वेळ आदर्श समजली जाते कारण यावेळेस कार्नेशन पिकाचे शेंडे सहजपणे तुटतात.
पिंचिंग प्रक्रिया केल्यनानंतर लगेचच बाविस्टीन (१.५ ग्रॅम/लिटर) स्प्रे घेतला जातो.
पिंचिंग करण्याच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत.
- सिंगल पिंचिंग पद्धत.
- पिंचिंग अॅण्ड हाफ पद्धत.
डिसबडिंग
झाडाच्या विकासासाठी तसेच उच्च गुणवत्ताची फुले मिळवण्यासाठी झाडावर असणाऱ्या अपरिपक्व कळ्या काढून टाकल्या जातात या प्रक्रियेला डिसबडींग असे म्हणतात. स्प्रे कार्नेशनमध्ये केवळ मुख्य कळी काढली जाते व खालील बाजूच्या कळ्यांना वाढू दिले जाते. डिसबडिंग करताना कार्नेशन पिकाच्या मुख्य खोडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
कार्नेशन पिकाची हाताळणी.
कार्नेशन पिकामध्ये योग्य वेळी जाळ्या लावणे याला फार महत्त्वं आहे. कारण जाळ्या लावण्यास उशीर झाला तर कार्नेशनची झाडे एका बाजूला पडतात, त्यामुळे त्याच्या खोडाचे मोठे नुकसान होते. परिणामी फुलांच्या उत्पादनात फार मोठी घट होते. तसेच जर जाळ्या फार लवकर लावल्या तर फुल काढणी अडचणीची ठरू शकते म्हणून पिकाचे नियमित निरीक्षण करून योग्यवेळी जाळ्या बसवाव्या लागतात.
फुलांची काढणी
कार्नेशन पिकामध्ये साधारण लागवडीनंतर चौथ्या महिन्यापासून फुलांच्या काढणीस सुरूवात होते. काढणी सकाळी व दिवसाआड केली जाते.
स्टँडर्ड कार्नेशन प्रकारात फुलांच्या बाहेरील सर्व पाकळ्यांवर रंगांची छटा दिसू लागताच, त्याची काढणी केली जाते.
स्प्रे कार्नेशन प्रकारातील फुले काढताना झाडावरील कमीत कमी फुले उमललेली असावीत व बाकीच्या कळ्यांनी रंग दाखविलेला असावा.
फुले काढणीसाठी धारदार चाकूचा किंवा कात्रीचा वापर केला जाते.
उन्हाळयात जादा उत्पादनासाठी फुलदांडयांची लांबी कमी ठेऊन काढणी करावी जेणे करुन झाडावर पुन्हा जास्त फुले मिळतील. फुलदांडयांवर जेथे दोन पानात जास्त अंतर असेल तेथून फुलांची काढणी करावी. फुले काढल्यानंतर लगेच पाण्यात ठेवावीत.
कार्नेशन पिकातील महत्त्वाचे रोग व कीड
कार्नेशन पिकातील महत्त्वाचे रोग व कीड या विषयी आपण माहिती पाहणार आहोत.
कार्नेशन पिकातील रोग –
खोडकुज व मर ( Fusarium Wilt)
या रोगाचा प्रादुर्भाव फ्युसेरियम ऑक्सीस्पोरम (Fusarium oxysporum) या बुरशीमुळे होतो
लक्षणे:
झाडाची पाने गळतात, तर काही फांद्या मरू लागतात. रोपाच्या खोडावर तपकिरी पट्टे दिसू लागतात, तसेच झाडाची वाढ खुंटते. या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडी आगोदर माती निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. हरितगृहामधील जास्त आर्द्रता या रोगासाठी अनुकूल आहे.
ग्रे मोल्ड (Botrytis Cinerea)
या रोगाचा प्रादुर्भाव बोट्रायटिस सिनेरिया (Botrytis cinereal) या बुरशीमुळे होतो.
लक्षणे
प्रथम फुलाच्या पाकळ्यांवर काही काळसर डाग दिसू लागतात व नंतर त्या डागांवर राखाडी रंगाची बुरशी दिसू लागते व ती वेगाने पसरू लागते.
अल्टरनेरिया लिफ स्टेन (Alternaria Leaf Stains)
लक्षणे
या रोगामध्ये रोपाच्या पानावर व देठा वर तसेच कधी-कधी फुलांवर जांभळ्या रंगाचे छोटे डाग दिसतात. नंतर हे डाग ५ मिमीपर्यंत मोठे होतात. कालांतराने रोगाची पाने मारतात.
मुळकुज (Root rot)
या रोगाचा प्रादुर्भाव फायटोफथोरा (Phytophthora spp) मुळे होतो
लक्षणे
झाडाची पाने मुरगळतात व काही दिवसांनी ती गळून पडतात, पानाच्या देठावर तपकिरी पट्टे दिसू लागतात.
बट रॉट
या रोगाचा प्रादुर्भाव रायझोक्टोनिया सोलानी (Rhizoctonia solani) मुळे होतो.
लक्षणे –
झाडाची पाने पिवळसर होतात व नंतर ती गळून पडतात. याच्या जास्त प्रादुर्भावामुळे रोप मरते.
कार्नेशन मोटल व्हायरस (Carnation Mottle Virus)
कार्नेशन पिकामध्ये हा व्हायरस आढळतो. याला ओळखणे तसे अवघड आहे. याची लागण झालेल्या रोपाची फुले निस्तेज होतात, तर पाकळ्या मध्ये विसंगती आढळते. फुलांचा दर्जा खालावतो. यामुळे उत्पादन फरक पडतो. हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे.
कार्नेशन पिकातील कीड
मावा (Aphids)
ही कीड पानाच्या खालील बाजूस सापडते व हिरवट गुलाबी रंगाची असते. कळया व फुलातील रसाचे शोषण या किडीची पिल्ले व पूर्ण वाढ झालेले कीटक करतात. त्यामुळे रोपाची पाने वेडीवाकडी होतात व पिवळी पडतात. तसेच, ही कीड पानावर चिकट द्रव सोडते, त्यामुळे पानावर बुरशी तयार होते.
फुलकिडे (Trips)
हे फुलकिडे पानांना व फुलांना खरवडून त्यातील रस शोषून घेतात. हे आकाराने सुक्ष्म असून फिक्कट पिवळसर रंगाचे असतात. त्यामुळे पानावर पिवळसर तांबूस पट्टे दिसतात. तसेच फुलांचा आकारही बिघडवतात
पाने गुंडाळणारी अळी
या आळया झाडाची पाने प्रथम गुंडाळता म्हणून याला पाने गुंडाळणारी आळी असे म्हणतात. त्या पानावर हल्ला करतात त्यामुळे पानावर चंदेरी पट्टे दिसतात. या आळ्यांनी कळया पोखरल्या मुळे फुले उमलत नाही व कळ्यांची अवेळी गळ होते.
लाल कोळी ( Red Spidermite)
लाल कोळी पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे झाडांची वाढ मंदावते. पानावर लाल-तांबूस पट्टे आढळतात. अगदी मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पाने वाळतात. ही हरितगृहातील अत्यंत धोकादायक कीड आहे.