हरितगृहातील काकडी लागवड आणि व्यवस्थापन 2024 ( cucumber farming)

काकडी हे हरितगृहा मधील महत्त्वाचे पीक आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये याला फार मागणी असते. याचा उपयोग सॅलड्स, रायता आणि लोणच्यामध्ये केला जातो. तसेच याची लागवड इतर पिकाच्या तुलनेत सहज करता येते. यामुळे काकडी पीक हे शेतकऱ्यात लोकप्रिय आहे. याची लागवड साधारणपणे वर्षभर केली जाते.

काकडी पिकाच्या फळधारणा होणेसाठी, परागीकरण होणे आवश्यक असते. हे परागीकरण मधमाश्या द्वारे व इतर कीटकामार्फत होते. पण पॉलीहाऊसमध्ये मधमाश्या व त्यासारख्या किटकाना आत प्रवेश करणे अवघड जाते, म्हणून पॉलीहाऊसमध्ये पिकाची लागवड करत असताना “पार्थेनोकार्पिक” प्रजातीच्या काकडीची लागवड करणे आवश्यक आहे.

काकडीची लागवड जवळपास सर्व प्रकारच्या मातीत करता येते. उत्तम निचरा असणारी माती या पिकासाठी मानवते, लागवड योग्य मातीचा पी.एच ५.५ ते ६.७ दरम्यान असावा.

रोपे तयार करणे

3 1

काकडीच्या बियांची उगवण क्षमता चांगली असल्याने बिया वाफ्यात पेरतात किंवा किमान ५ ते ६ आठवड्यांची रोपे लावणीसाठी वापरतात.

पॉली हाऊसमध्ये, काकडी लागवडीसाठी प्रो ट्रे चा उपयोग केला जातॊ. प्रो ट्रे भरण्यासाठी कोकोपीट आणि वर्मीकंपोस्ट सारख्या मिश्रणांचा वापर केला जातो. त्यानंतर प्रत्येक एका छिद्रात एक बी पेरला जातो. पेरणीनंतर बियाणे ३ ते ४ दिवसात अंकुरतात, ही रोपे २० ते २५ दिवसांत लागवडीयोग्य होतात.

काकडी लागवड पद्धत :

काकडी लागवड उंच निर्जंतुकीकरण केलेल्या गादी वाफ्यावर केली जाते. हे वाफे पुढीलप्रमाणे तयार करावेत.

  • पृष्ठभागाची रुंदी ९० सें.
  • दोन बेड मधील चालण्याचा रस्ता ५० सें. मी
  • उंची ४० सें.मी.

मल्चिंगचा वापर

mulching for cucumber

काकडी लागवडीसाठी बेड बनवताना मल्चिंगचा वापर करणे फायदेशीर ठरते, कारण यामुळे तणाचा बंदोबस्त होतो, तसेच मातीतील ओलावा टिकण्यास मदत होते.

पण जर नवीन  पिकाची लागवड  उन्हाळ्याच्या दिवसात करायची असेल, तर मल्चिंगचा वापर करणे टाळावा.

लागवडीचे अंतर

१) दोन झाडांत ६० सें.मी.

२) दोन रांगात ५० सें.मी.

सिंचन

काकडी पिकासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा उपयोग केला जातो, यामध्ये रोपाच्या वाढीनुसार पाण्याचा व खताचा समतोल राखला जातो. रोपाच्या मुळांच्या कक्षेत ओलावा राहील याची शेतकऱ्याने काळजी घेणे जरुरीचे आहे.

काकडी मधील विशेष मशागत पद्धती

ग्रीनहाऊसमध्ये लावण्यात येणाऱ्या काकडीच्या वेलाची पाने खूप मोठी असतात. ती जोमाने वाढतात आणि त्यासाठी त्यांना भरपुर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. म्हणून हरितगृहातील वेलींच्या पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी, वेलींना वळण देणे जरुरीचे असते.

काकडीच्या वेलाला वळण देणे व छाटणी

Cucumber Trellising pruning and training.

यामध्ये काकडीच्या वेलाला २.५ – ३ मीटर उंचीवरील तारेवर जमिनीशी काटकोनात वाढवतात. जेव्हा काकडीचा वेल तारे जवळ पोहचतो, तेव्हा त्यांचा शेंडा खुडून त्यांचा आकार छत्रीसारखा येईल अशी छाटणी केली जाते.

जेव्हा काकडीच्या वेलाची, तारेच्यावर वर एक किंवा दोन पाने विकसित होतात, तेव्हा मुख्य स्टेमचा वाढणारा भाग (शेंडा) काढला जातो. त्यानंतर तारेच्या वरच्या बाजूला असलेल्या, दोन्ही बाजूच्या शाखांना वाढवले जाते. त्यानंतर त्यांना तारेच्या खालच्या दिशेने वाढू दिले जाते. जेव्हा तो वेल जमिनी जवळ पोहचतात, तेव्हा त्याचा शेंडा काढला जातो.

 फळांची विरळणी

झाडांचा जोमदारपणा व फळांचा भार यावर फळांची विरळणी अवलंबून असते. पानाच्या बेचक्याधून फळे सतत वाढण्यावर फळाचा विकास अवलंबून असतो. ज्यावेळी बरीच फळे एकत्र सेट केल्यास, त्याची वाढ कमी होते व विक्री योग्य नसणारी लहान फळे तयार होऊ शकतात. म्हणून लहान, वेडीवाकडी व कमी  दर्जाच्या फळांची विरळणी करणे आवश्यक आहे.

काढणी

6

सर्वसाधारणपणे लावणीनंतर ५० ते ६५ दिवसांनी काढणी सुरु होते. काकडीचा आकार लगेच मोठा होतो, म्हणून २ ते ४ दिवसांच्या अंतराने याची काढणी केली जाते.

काकडी पिकातील प्रमुख रोग व कीड

काकडी पिकातील महत्त्वाचे रोग व कीड या विषयी आपण माहिती  पाहणार आहोत.

काकडी पिकातील प्रमुख रोग

मर (Damping Off)

या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बी रूजताच ते कुजण्यास सुरवात होते. या रोगाच्या प्राथमिक अवस्थेत रोपे उगवून आल्यावर त्याची दोन्ही दले गळतात आणि झाडाची वाढ थांबते. तसेच पाने शेंड्याकडून वाळत येतात आणि खोड तपकिरी होते. जर पाण्याचा निचरा योग्य नसेल तर याचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो.

हा रोग ओलसर आणि थंड वातावरणात अधिक वेगाने वाढतो, तसेच अति उष्ण तापमानात देखील याची समस्या उद्भवू शकते.

खोडकुज व मर ( Fusarium Wilt)

cucumber Fusarium Wilt

हा बुरशीजन्य रोग आहे. हा मुख्यत: रोपाच्या मूळ आणि खोडाच्या संवाहनी ऊतकांवर (vascular tissue) हल्ला करतो, पाणी आणि पोषक द्रव्याच्या वाहतुकीस अडथळा निर्माण करतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते, आणि नंतर ते मरते.

केवडा (Downy Mildew)

cucumber downey mildew

या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे, पानाच्या वरच्या बाजूस फिकट हिरवट, पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ वातावरणात या रोगाचा प्रसार वेगाने वाढतो. या ठिपक्याच्या खालच्या बाजूला जांभळट रंगाची बुरशीची वाढ झालेली दिसते. रोग ग्रस्त झाडाला फुले व फळे कमी प्रमाणात व निकृष्ट दर्जाची येतात

भुरी (Powdery mildew)

cucumber Powdery mildew

हा बुरशीजन्य रोग आहे, याच्यामुळे काकडीवर बुरशी येते. पानांच्या वरच्या बाजूला पांढरी पावडर आणि पानांच्या खालच्या बाजूला बुरशीची वाढ ही याची लक्षणे आहेत. पांढत्या पावडर व बुरशीमुळे फळे व पाने विकृत होतात. ही विकृत आणि डाग पडलेली झाडाची पाने नंतर गळून पडतात, परिणामी कमी उत्पादन आणि लहान फळे येतात. तसेच फळांच्या चवीवरही याचा परिणाम होतो कारण याच्यामुळे पानांमध्ये कमी प्रमाणात साखर साठवली जाते.

Cucumber Yellow Stunted Disorder virus (CYSDV)

 हा विषाणूजन्य रोग पांढऱ्या माशी द्वारे पसरतो. याचे लक्षण पाने चमकदार पिवळे होतात व पानाच्या हिरव्या शिरा दिसून येतात. यामुळे रोपातील हरीतद्रव्याला इजा पोहोचते, याचा थेट परिणाम वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण क्षमतेवर होतो. उत्पादन घटते.

काकडी पिकातील प्रमुख कीड

कोळी (Spidermite)

cucumber mites

माइट्सने ग्रस्त रोपाच्या पानांवर लहान पिवळे किंवा पांढरे ठिपके दिसतात. जास्त प्रादुर्भाव झालेली पाने पूर्णपणे धूसर होतात व पानांवर जाळे तयार होते आणि ते अकाली गळतात. उष्ण तापमानात माइट्सचा त्रास अधिक जाणवतो.

फुलकिडे (Trips)

थ्रिप्स ही कीड काकडी पिकासाठी फार धोकादायक नसते, पण याची योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. रोगग्रस्त पानावर पांढरे तपकिरी डाग दिसू लागतात, याशिवाय पाने किंचित वळतात. थ्रिप्स मुळे विषाणू रोगाचा प्रसार होण्यासाठी मदत होते.

पांढरी माशी (white fly)

cucumber Whitefly

पांढरी माशी ही ग्रीन हाऊसमधील काकडी पिकासाठी घातक कीड आहे.

पांढरी माशी अतिशय जलद वेगाने वाढते, रोगग्रस्त झाडावरील पानाच्या खालच्या बाजूला पांढरी माशी मोठ्या संख्येने आढळून येते.

पाने पिवळी पडतात तसेच पानाची वाढ खुंटते. पानांवर मधासारखे डाग जमा होतात व नंतर ते गडद काळे पडतात.

पांढऱ्या माशीमुळे विषाणूचा प्रसार होतो. म्हणून पांढऱ्या माशीची लागण झाल्याबरोबर लगेच त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे.

नाग आळी ( Leaf- Miner)

cucumber Leaf Miner

नाग आळी रोपाच्या कोवळ्या भागातून व पानातून रस शोषून घेते. तसेच पानात नाग आळी पानावर अनेक भुयारे निमार्ण करते. पानात उपलब्ध असणाऱ्या हरिद्रव्यला इजा पोहचवते त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत काही प्रमाणात अडथळा निर्माण होतो. कालांतराने प्रभावित पाने कोमजते आणि सुकून जातात.

सूत्रकृमि (Nematodes)

cucumber Nematodes

सूत्रकृमि मुळे रोपाच्या मुळात गाठ निर्माण होतात, यामुळे पिकाला पाणी आणि पोषक द्रव्ये शोषण्यास अडचणी निर्माण होतात. या रोगामुळे झाडाच्या विकासावर गंभीर परिणाम होतो आणि उत्पन्नात लक्षणीय घट होते.

Leave a Comment

Pin It on Pinterest