हरितगृहातील गुलाब फुलशेती

गुलाबाला फुलांचा राजा असे म्हणतात. गुलाब हे अतिशय सुंदर, आकर्षक व मनमोहक फुल आहे. तसेच ते प्रेमाचे प्रतिक आहे.

Table of Contents

गुलाबाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात फार मागणी आहे. त्यामुळे ग्रीन हाऊस मध्ये उच्च प्रतीच्या गुलाबची लागवड दिवसें-दिवस वाढत आहे आणि यासाठी भारत सरकार देखील अनुदान देऊन गुलाब शेतीस प्रोत्साहन देत आहे.

 गुलाबांची लागवड मुख्यतः निर्यातीच्या उद्देशाने केली जाते. भारत देश गुलाबाची निर्यात युरोप, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात करतो.

गुलाब पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटक

  • सूर्यप्रकाश – ४०००० – ६०००० lux
  • तापमान – १५ – १८°C
  • आर्द्रता ६०% – ६५%
  • चांगल्या प्रतीचे पाणी
  • पिकाची चांगली वाढ होणारे माध्यम (माती किंवा कोकोपीट)

 गुलाब लागवडीसाठी मातीची निवड करणे

 गुलाबाच्या लागवडीत यशस्वी होण्यासाठी योग्य मातीची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे.

मातीचा पी.एच ५.५ ते ७ दरम्यान असावा.

मुळांच्या चांगल्या वाढीसाठी आणि झाडाच्या मुळांना मातीमध्ये लवकर प्रवेश मिळावा यासाठी, माती अत्यंत छिद्रयुक्त आणि निचरा होणारी असावी.

गुलाब लागवडीसाठी कृत्रिम माध्यमाचा देखिल वापर केला जातो जसे की कोकोपीट.

गुलाब लागवडीपूर्वी माती निर्जंतुकीकरण

गुलाब लागवडीपूर्वी माती निर्जंतुकीकरण आवश्यक असते. माती निर्जंतुकीकरणासाठी हायड्रोजन पेरोक्साइड विथ सिल्वर (Hydrogen peroxide with silver) हे केमिकल वापरले जाते कारण ही पद्धत अत्यंत सोपी, आर्थिकदृष्ट्या स्वस्त

 आणि कार्यक्षम आहे.

प्रक्रिया:

साधारणपणे १ एकर (४००० चौ. मीटर) करता १२० लिटर हायड्रोजन पेरोक्साइड विथ सिल्वरची गरज असते.

  • प्रथम लागवडीसाठी बनवण्यात आलेले बेड ठिबक सिंचनद्वावरे ओले करावेत.
  • त्यानंतर ९० लिटर हायड्रोजन पेरोक्साइड विथ सिल्वर १०,०००-११,००० लिटर पाण्याबरोबर मिसळावे व ते ठिबक सिंचनाद्वारे बेडवर सोडावे.
  • उरलेले ३० लिटर हायड्रोजन पेरोक्साइड विथ सिल्वर ४००० लिटर पाण्यात मिसळावे व ते पाणी झारीने बेडवर व बेडच्या कडेवर फवारावे.
  • त्यानंतर आपण ४ ते ६ तासांनी  पिकाची लागवड करु शकतो.

गुलाब लागवडीसाठी बेड कसा असावा

गुलाब लागवडीसाठी उंच बेडचा (गादी वाफा) वापर केला जातो, यामुळे रोपांच्या मुळांना वाढीसाठी योग्य जागा मिळते व हवा खेळती राहण्यास मदत होते.

बेडची रचना खालीलप्रमाणे असावी:

3 Bed preparation
गुलाब लागवडीसाठी गादी वाफा
  • बेडची उंची: ४५ से.मी.
  • शीर्षस्थानी बेडची रुंदी: ९० सें.मी.
  • दोन बेड दरम्यानचा मार्ग: ४५ से.मी.

या बेडमध्ये सेंद्रिय खते भरपुर प्रमाणात वापरावीत, कारण ती रोपांना  अन्नद्रव्ये पुरवतात आणि मातीचा पोत सुधारण्यास मदत करतात.

 रोपाच्या मुळांची चांगली वाढ व्हावी, यासाठी चांगले कुजलेले शेणखत आणि डी.ए.पी किंवा एस.एस.पी (१० ते १५ ग्रॅम/वर्गमीटर) योग्य प्रकारे बेडच्या वरच्या थरावर मिसळावे.

गुलाब लागवडीसाठी पॉलिबॅग पध्दत वापरुन रोपे तयार केली जातात. सदर रोपांवर पाहिजे त्या जातीचे डोळे भरुन अथवा कलम करुन ती रोपे लागवडीसाठी वापरतात.

लागवड करण्यापूर्वी, चांगल्या प्रतीचे वाण आणि योग्य रंग संयोजन महत्त्वपूर्ण आहे.

गुलाबामध्ये लाल, पिवळा, गुलाबी, केशरी, पांढरा असे अनेक रंग उपलब्ध आहेत. लाल रंगाच्या फुलाला स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त मागणी आहे, व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी याची मागणी फार असते. गुलाब उत्पादक शेतकरी व्हॅलेंटाईन डे च्या विक्रीतून चांगली कमाई करतात.

व्यावसायिक गुलाब उत्पादक या प्रकारे ग्रीनहाऊसमध्ये रंग संयोजन करतात

लाल५०-६०% किंवा ९०-१००%
पिवळा१५%
गुलाबी१५%
केसरी१०%
पांढरा५%
डबल कलर५%

भारतातील सर्वात लोकप्रिय गुलाबांची वाण.

VarietiesColour
Top secret/Taj MahalRed
Gold StrikeYellow
CorvetteOrange
Tropical AmazonOrange
White AvalancheWhite
Peach AvalanchePeach
Bon Heurink
Hot Shot Pink
Sweet AvalancheLight Pink
NoblesseLight Pink
SovereignBicolour

गुलाबाची लागवड

4. Plantation
गुलाबाची लागवड

लागवडीयोग्य रोपे सहसा ५ ते ६ आठवड्यांची डोळे भरलेली किंवा कलम केलेली असावीत. तसेच गुलाब रोपे निरोगी असणे आवश्यक आहे.

गुलाब लागवडीसाठी घनता ८-१० रोपे/चौ.मी. योग्य आहे.

एका बेडवर लागवड केलेल्या दोन ओळीत रोपापासून रोपाचे अंतर १८ सेमी आणि ओळ ते ओळ ३० सेमी असते.

  • ओळ – ओळ – ३० सें.मी.
  • रोप – रोप – १८ सेंमी

लागवडी नंतर हरितगृहामध्ये आर्द्रता ८०% पर्यंत ४-६ आठवडे राखली जाते.

गुलाबासाठी विशेष आंतर मशागत पद्धत:

व्यावसाईक गुलाब शेतीमध्ये रोपांची योग्य वाढ व अधिक उत्पादन मिळवण्यासाठी या महत्त्वाच्या मशागत पद्धतीचा अवलंब केला जातो. आपण या भागात या विषयी माहिती घेणार आहोत.

मातृकाडीची बेन्डींग करणे

एक महिन्यानंतर गुलाबाच्या रोपाची वाढ होते व मातृकाडीला कळी येते. ही कळी आल्यानंतर प्रथम तोडून टाकावी. ही कळी तोडल्यानंतर मुख्य फांदीवर २-३ डोळे वाढतात व त्यांचे रुपांतर पुढे जाऊन फांद्यामध्ये होते आणि या फांद्याना नंतर कळ्या येतात.

झाडाच्या या अवस्थेत ही मातृकाडी उपफांद्यासह दोन बेडमधील चालायच्या रस्त्याच्या दिशेने वाकवली जाते. ही मातृकाडी नेहमी क्राऊनच्या ठिकाणी वाकविली जाते. असे केल्याने गुलाबाच्या झाडाला तळापासून नवीन फांद्या येतात व त्यावर नवीन फुले प्राप्त होतात.

ही फुले आकाराने मोठी व लांब दांड्याची असतात, या फुटव्याला बेसल किंवा तळफुटवा म्हणतात. या तळफुटव्याचा (बेसल) उपयोग पुढे जास्त उत्पादनासाठी व झाडाची संरचना अधिक चांगली करण्यासाठी होतो.

झाडाच्या संरचनेचा विकास

मातृकाडी वाकवल्या नंतर गुलाबाच्या रोपाला काही दिवसात फुटवा येतो. या फुटव्यापासून झाडाची संरचना करण्यासाठी उपयोग होतो. हि संरचना जितकी अधिक चांगली, तितके अधिक झाडापासून उत्पन्न. या कामासाठी कुशल आणि अनुभवी मजुराची गरज असते.

गुलाबातील बेन्डिंग

झाडावरील अनावश्यक फाद्यांची गर्दी टाळण्यासाठी तसेच झाडावर पानांचे पुरेसे प्रमाण राखण्यासाठी गुलाबामध्ये बेन्डिंग केले जाते. यामुळे निरोगी फांद्यांच्या वाढीसाठी चालना मिळते. रोग व कीड नियंत्रण करण्यास याचा फायदा होतो. बेन्डिंग करण्याअगोदर फांद्यांच्या कळ्या काढून टाकल्या जातात. बेन्डिंग हे पहिले किंवा दुसरे पान सोडून केले जाते. बेन्डिंगच्या खाली आलेले जोमदार फुटवे तेवढे वाढू दिले जातात. बारीक-कमजोर असे फुटवे असतील तर त्यांचा वापर उत्पादनासाठी होत नसल्याने त्यांचे पुन्हा बेन्डिंग केले जाते.

जंगली फुटवे काढून टाकणे

रूटस्टॉक वर आलेले जंगली फुटवे जोडापासून किंवा फुटलेल्या जागेपासून काढून टाकले जातात. असे फुटवे पुन्हा येणार नाहीत याची काळजी घेतली जाते.

डिसबडिंग

अधिक गुणवत्तेची फुले मिळण्याकरिता डिसबडिंग केले जाते. मुख्य कळी असलेल्या गुलाबाच्या फांदीवरील पानांच्या बेचक्यातून वाढणाऱ्या इतर कळ्या काढून टाकल्या जातात यामुळे झाडाची ऊर्जा वाया न जाता अधिक गुणवत्तेची फुले प्राप्त होतात.

छाटणी

ऑफ सिझन (जून -जुलै) महिन्यामध्ये गुलाबाची छाटणी केली जाते. जर छाटणी केली नाही तर गुलाबाच्या येणाऱ्या नवीन फांद्या कमकुवत येतात. छाटणी करतेवेळी दोन पानावर केली जाते तसेच रोगग्रस्त फांद्या काढून टाकल्या जातात.

माती खुरपणी

दैनंदिन सिंचनामुळे, बेडचा पृष्ठभाग कठीण होते त्यामुळे रोपाच्या मुळांना खत व हवा मिळणे अवघड जाते म्हणून बेड वरील माती खरवडून सैल करणे आवश्यक असते. दर १५ दिवसानंतर बेडमधील माती खुरपणी केली जाते. बेडवरील ५ सें. मी. पर्यंत मातीचा थर खुरपला जातॊ. यापेक्षा अधिक खोल खुरपणी केली असता मुळे तुटण्याची संभावना असते.

गुलाबासाठी सिंचन

गुलाबाला सिंचन करण्यासाठी पाण्याची गुणवत्ता खालीलप्रमाणे असावी:

  • पी.एच: ६.५ – ७
  • ई.सी: ०.५ -१ एम.एस/सेमी

ठिबक सिंचन तपशील

  • पाण्याचे समान वितरण होण्यासाठी PCND ड्रीपर चा वापर करावा.
  • एका बेडवर दोन लॅटरलचा वापर करावा.
  • ड्रीपर डिस्चार्ज क्षमता १.२ – ४ एल.पी.एच.

लागवडीनंतर, चार आठवड्यांसाठी झारीने रोपांना एकसमान पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मुळे एकसमान वाढण्यास मदत होते .

चार आठवड्यांनंतर ठिबक सिंचनाचा उपयोग करावा .

गुलाब रोपांना दररोज पाण्याची गरज अंदाजे ४००- ६०० मिली लीटर इतकी असते.

कडक उन्हाळ्यात फॉगर (fogger) व मिस्टर (mister) चा वापर करून आर्द्रता राखली जाते.

सिंचनापूर्वी मातीचे निरीक्षण करावे आणि मातीचा ओलावा तपासावा. त्यानंतर सिंचनासाठी पाण्याचे प्रमाण ठरवावे. पाण्याचे प्रमाण हे हंगामासह बदलते, परंतु त्याची वारंवारता समान असते.

दुपारी १२ च्या आधी सिंचन करावे.

गुलाब शेतीसाठी खत व्यवस्थापन

लागवडीपूर्वी व लागवडीनंतर माती परीक्षण करुन खतांच्या मात्रा द्याव्यात. लागवडीचे वेळेस २ किलो सुपर फॉस्फेट, १ किलो कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आणि ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति चौ.मी. द्यावे. तसेच शेणखत व भाताचे तूस जमिनीत मिसळून द्यावे.

एकाच वेळेस खते देण्याऐवजी वेगवेगळ्या हप्त्यात ती विभागून द्यावीत. हरितगृहात द्रवरुप खते पाण्यात मिसळून दिली जातात, प्रत्येकी २०० पी.पी.एम  नत्र व पालाश पाण्यातून रोपांना दिले जाते. त्यासाठी ८५ ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट व ८० ग्रॅम अमोनियम नायट्रेट प्रति लिटर पाण्यात घेऊन ते नंतर २०० लिटर पाण्यात मिसळून झाडांना द्यावे.

गुलाब फुलांची काढणी

6. Harvesting
गुलाब फुलांची काढणी

फुलांची काढणी शक्यतो सकाळच्या वेळी थंड वातावरणात करावी, म्हणजे फुले जास्त काळ ‘फिल्ड हीट’ कमी करण्यासाठी शीतगृहात ठेवावी लागत नाहीत व तो खर्च वाचतो. फुलांची काढणी धारदार कात्रीने करावी.

झाडावर १ ते २ पूर्ण वाढ झालेली (पाच पाने असणारी ) पाने ठेवावीत म्हणजे नंतर येणारी फुलेही चांगल्या प्रतीची व लांब दांडयाची राहतील, जर पूर्ण वाढ झालेली पाने झाडावर ठेवली नाहीत तर मात्र फुल दांड्याची लांबी कमी रहाते.

फुलांची काढण्योत्तर काळजी

web duch rose
गुलाब फुलांची काढण्योत्तर काळजी

फुले काढल्यानंतर पंधरा मिनिटांच्या आतच पाण्यात ठेवावीत व लगेचच पंधरा ते वीस मिनिटात ग्रेडिंग हॉलमध्ये न्यावीत. प्रिझर्वेटिव्ह म्हणून पाण्यात अॅल्युमिनियम सल्फेट टाकावे. या द्रावणात ३ तास फुले ठेवावीत व नंतर प्रतवारी करावी. प्रतवारीनंतर फुले पुन्हा याच द्रावणात किंवा क्लोरिनच्या पाण्यात ठेवावीत. बादलीत ७-१० सें.मी.पर्यंत द्रावण असावे. या द्रावणात फुले पॅकिंग करेपर्यंत ठेवावीत.

जर वरील प्रिझरवेटिव्ह उपलब्ध नसतील तर २०० लिटर पाण्यात ३ किलो साखर व ६ ग्रॅम सायट्रीक ऍसिड मिसळून द्रावण तयार करावे व त्यामध्ये फुले ठेवावीत.

प्रतवारी

 गुलाबाच्या फुलांची प्रतवारी फुलदांडयाच्या लांबीवरुन केली जाते. प्रत्येक ग्रेडमध्ये १० सें.मी. चे अंतर ठेवावे. फुलांची ग्रेड ३० ते ९० सें.मी. ग्रेडमध्ये केली जाते. फुलदांडयाच्या लांबी बरोबरच दांडयाची जाडी, फुलाचा आकार, पाने, रोग व किटकनाशकांच्या उर्वरीत अंशाचा विचार करून प्रतवारी केली जाते. प्रतवारी केलेल्या एका ग्रेडमधील सर्व फुले त्याच प्रतीची असावीत अन्यथा एखादे खराब फूल सारीच प्रतवारी बिघडवून टाकते. ग्रेडिंग केल्यावर पुन्हा फुले प्रिझर्वेटिव्ह द्रावणात ठेवावीत.

पॅकिंग

8. Packaging
गुलाब फुलांची पॅकिंग

२० फुलाची एक जुडी याप्रमाणे फुलांच्या जुडया बांधाव्यात. त्यानंतर प्रत्येक जुडी कोरुगेटेड बॉक्स मध्ये भरावी.

शीतगृहात प्रिकुलिंग युनिट असावे. जेणे करुन बॉक्समधील गरम हवा लगेचच बाहेर काढता येईल. शीतगृहातील तापमान २० °C पर्यंत असावे. बॉक्सचे तापमान शीतगृहाच्या तापमानाइतके होण्यास १०-१२ तास लागतात. शीतगृहात ९० टक्के च्या आसपास आर्द्रता ठेवावी, म्हणजे फुलांचे डिहायड्रेशन होणार नाही.

Leave a Comment

Pin It on Pinterest